सखे...
सखे...
सखे...
सखे...
हा चंद्र दिसतोय ना?
तो आहे....
माझ्या मनाचा सारीपाट,
ज्यावर तुझ्या अजस्त्र जीभा वळवळताहेत!
हलाहल ओकून तू निघून
जातांनाच्या तुझ्या रक्तवर्ण
खुणा दिसताहेत बघ...!
सखे,
तू पाहिलेस का नीट
निरखून..?
हा चंद्र आहे ना,
तो आहे...
माझ्या मनाचा डागाळलेला मुकुर!
ज्यावर दिसताहेत तुझी
हिंस्त्र नखं...!
आणि तो बघ...
तुला दिसतोय का तो व्योमपट?
ज्यावर उमटलेत तुझ्या काळ्याकुट्ट
पावलांचे परतीचे ठसे,
सखे,
जातांना तू पेरून गेलीस
एक गाणं..आठवतंय?
ते गुणगुणतांना विषारी
होत चाललेत माझे ओठ..!
सखे,
आता घे आवरून
हा तुझा आकाशभर पसरलेला कंटकांचा पदर
मला आता पडायचे आहे
शांत..निश्चल..
समोरच्या खडकावर!

