श्रावण सणांचा मेळा !!
श्रावण सणांचा मेळा !!
रिमझिम पडती पाऊसधारा
सोबत घेवून गार वारा
सोनेरी किरणांसह घेवून सणांचा मेळा
श्रावण आला श्रावण आला श्रावण आला रे !!
श्रावण सोमवारी असे शंकराचा मान
त्याच्या पुजेसाठी नेवू फुलं अन बेलाची पानं
तीळ तांदुळानं शिवामूठ वाहू या !!
मंगळवारी असे बघा मंगळागौरीचा सण
आनंदानं हर्षीत होई सार्या सुवासिनींचे मन
मंगळागौर पुजुनी झिम्मा फुगडी खेळू या !!
नागपंचमीला असे हो नागोबाचा मान
डोल डोलावूनी आपली फणा डोलवी आनंदानं
लाह्या फुले वाहून तया दूध अर्पू या !!
पंचमी नंतर रविवारी असे कानुबाई उत्सव
खान्देशी दैवता देवू आपण माहेराचा मान
आरती करुनी मनोभावे रोट पुजू या !!
आली नारळी पुनव दर्याला आलंया उधाण
याच्या जीवावरी सुखी आहे कोल्यांचं जीवन
आळवुनी तया सोनियाचं नारळ वाहू या !!
हाती घेवून पुजेचं ताट पाहू या बंधुची वाट
बंधू न दिसता बेचैन हे मन रक्षाबंधन वाटे ना सण
आला आला बंधूराजा त्याला औक्षण करू चला
शुभेच्छा गुंफुनी तया राखी बांधू या !!
गोकुळअष्टमिला आपण सारे मिळुनी होवू गोळा
जागरणानं साजरा करु या श्रीकृष्ण जन्मसोहळा
मध्यरात्री कृष्णासाठी पाळणा गावू या !!
आला आला कृष्ण आला त्या सह रंग खेळू चला
मिळुनिया सारे सोबती चला करु या गोपालकाला
आनंदाने सारे दहीहंडी फोडु या !!
शेतकर्यांच्या आनंदाचा सण हा आला बैलपोळा
स्नान घालुनी सजवून वृषभा पुरणपोळी खावू घाला
कृतज्ञतेने बैलांना मग पोळ्यात मिरवू या !!
