हवी हवीशी माझी शाळा !!
हवी हवीशी माझी शाळा !!
छान छान छान माझी शाळा किती छान
शाळा छान,विद्यार्थी छान शिक्षक ही छान !!
परिपाठात राष्ट्रगीत,प्रतिज्ञा,संविधान स्फुर्ती देई
प्रार्थना,स्तोत्र,श्लोकांनीही मन हे प्रसन्न होई
बोधकथा अन सुविचारांनी हुरुप येई छान !!
दिसती जरी जुनाट आमच्या शाळेच्या या भिंती
परि अध्यापन आमच्या शिक्षकांचे आहे बहू किमती
ज्ञानदानासह देती आम्हा सुसंस्कारांचेही दान !!
राष्ट्रीय अन धार्मिक सार्या सण उत्सवांची
महती अन साजरे करण्याची कारणं ही आम्हा सांगती
रुढी परंपरा जपण्याचे मार्गदर्शन ही करती छान !!
मारामारी,दंगामस्ती,भांडाभांडी करुनी
एकदुजांची नावंही मग शिक्षकांना सांगुनि
उठाबशा,घोडीची शिक्षा अन हाती छड्या घेवुनी
उत्तम ऐसा उपदेश ही मग शिक्षकांचा ऐकुनी
क्षमा मागुनी घेत पुन्हा कधिही न भांडण्याची आण !!
कवायतीसाठी ठरवून मागील रांगेत उभे राहुनी
वेडीवाकडी कवायत करण्यात जात होतो रंगुनी
शिक्षकांच्या येता ध्यानी मिळे पाठीत धम्मकलाडू तो छान !!
विविध ऐशा स्पर्धांचे करुनिया नियोजन
सहभागासाठी आमचे शिक्षक देती आम्हा उत्तेजन
विजयाचा मग आनंद सारा वाटे तो भारी महान !!
शालेय पोषण आहार हा सार्यांनीच घ्यावा म्हणुनी
पोषण आहाराची पौष्टिकता आम्हा सांगितली समजावुनी
खिचडीची मग अंगत पंगत होई लई भारी छान !!
विविध गुणदर्शन सांस्कृतिक स्नेहसंमेलनावेळी
शाळेतील सार्या शिक्षकांचा उत्साह येई उफाळुनी
उत्तम ऐशा दिग्दर्शनानं होई गायन,वादन,नृत्यही छान !!
अशा या छान शाळेचा वाटे सदैवची अभिमान
नाव शाळेचे सांगण्या असेन सदैव ताठ माझी मान
हवी हवीशी ही शाळा लाभण्या भाग्य असे हे माझे महान !!
वाटे पुन्हा लहान होवुनी शाळेमध्ये जावे
हातावरल्या छडीसह दान शाब्बासकिचेही घ्यावे
साऱ्या मित्रांसोबत खेळण्यात रंगुनी जावे छान
छान छान छान माझी शाळा अशी छान !!
