शिवरायांचा सह्याद्री तोडू नकोस..
शिवरायांचा सह्याद्री तोडू नकोस..
नको रे नको स्वार्थी माणसा
हिरवीगार झाडे तोडू नकोस..
जनाची नाही तर मनाची राख
शिवरायांचा 'सह्याद्री' तोडू नकोस..
वृक्ष-वेली, सरिता-सागर निसर्ग
संपत्तीचा अनमोल ठेवा आहेत..
या परोपकारी मित्रांच्या छातीवर
तू आज कुऱ्हाड चालवत आहेस..
पक्ष्यांची घरटी, प्राण्यांची स्वप्ने
झाडांबरोबर अनाथ, उध्वस्त होतील..
झाडांची मुळे,खोडे,फांदया तुटतांना
किती संसार कोसळून संपून जातील..
हिरवे डोंगर, हिरवी झाडे तोडून
जंगल, जमिनीचा होईल सत्यानाश..
पाऊस, पाणी आणि श्वास कोठून
आणशील.. का आवळतोय हा फास ?
सरकार माय बापहो.. पर्यावरण,
निसर्गाच्या वेदनांचा व्हावा विचार..
झाडांचा, पशु पक्ष्यांचा जीव घेऊन
योजना, विकास कसा होईल साकार ?
मुक्या जीवांचा करुण आक्रोश ऐकून
भीमाशंकर वाचवूया हिरवळ जपूया ..
वसुधा,पर्यावरणाचा विनाश थांबवून
स्वच्छ, निकोप सृष्टीचे पाईक होऊ या..
