शिवराज्याभिषेक सोहळा
शिवराज्याभिषेक सोहळा
आज सोनियाचा दिन
उगवला सूर्य रायगडी
शहारल्या डोंगरद-या
आले उधाण सागरी ...
चहू दिशेस सांडला
मंद , गुलाबी प्रकाश
चैतन्य , स्फूर्ती घेऊनी आली
पहाट राजाला भेटावयास ...
खुलला अवघा महाराष्ट्र
शुध्द त्रयोदशीच्या दिनी
उजळूनी गेले सिंहासन
जेव्हा पेटल्या मशाली ...
आठ खांब अष्टकोनी
त्यावरी सुबकशी नक्षी
हि-या , माणकांनी सजले
सिंहासन बत्तीसमणी ...
भरीले सोन्याच्या कलशी
सप्त नद्यांचे अमृतजल
मंत्रघोषाच्या सुस्वरात
झाला छत्रपतींचा अभिषेक ...
लखलखला तो सुवर्णक्षण
शिवराय झाले सिंहासनाधीश्वर
दणाणूनी गेला आसमंत
होता शिवनामाचा गजर ...
नगारे , वाद्यांच्या तालात
अष्टदिशी तोफा धडाडल्या
सलामी दिल्या त्यांनी जणू
रयतेच्या गुणी राजाला ...
थाट पाहूनी स्वराज्याचा
झाले देवाधिकही आनंदी
टाळ , मृदूंगाच्या तालात
रंगले कीर्तन अंबरी ...
डोळे दिपले शिवभक्तांचे
पसरला हर्ष धरित्रीवरी
मराठ्यांच्या हॄदयी वसला
ऐसा वीर राजा हा शिवाजी ...
इतिहासाच्या सुवर्णपानी
अमर झाला राज्याभिषेक सोहळा
अशा जाणत्या राजाला
आमुचा मानाचा हा मुजरा...!!!
