आई
आई
मांगल्याचे रूप तू ,
दरवळणारा धूप तू ...
आसमंत उजळविणारा ,
लखलखणारा दीप तू ...
आयुष्याचा ध्यास तू ,
सुखाची बरसात तू ...
अंतरंगी उमलणा- या ,
बकुळीचा सुवास तू ...
माहेराची गाणी तू ,
दाटल्या डोळ्यांतील पाणी तू ...
मुक्यालाही बोलते करणारी ,
अमृताची मधूर वाणी तू ...
हॄदयीचा हुंकार तू ,
गूढ मनीचा झंकार तू ...
आर्त ओल्या जखमांवरील ,
अलवार हळवी फुंकर तू ...
प्रेमफुलांची आरास तू ,
काळजाचा श्वास तू ...
मंदिरात तेवणा-या ,
मंद समईचा प्रकाश तू ...
दुःखातील आधार तू ,
ईश्वराचा अवतार तू ...
मायेचा अन् वात्सल्याचा ,
आहेस अनमोल अलंकार तू ...
