STORYMIRROR

Shirish Padmakar Deshmukh Deshmukh

Inspirational

3  

Shirish Padmakar Deshmukh Deshmukh

Inspirational

शिक्षक म्हणजे शिक्षक असतो.

शिक्षक म्हणजे शिक्षक असतो.

2 mins
28.8K


शिक्षक म्हणजे शिक्षक असतो.

राष्ट्राच्या भवितव्याचा तत्वनिष्ठ संरक्षक असतो.

शिक्षक म्हणजे शिक्षक असतो.

शाळाशाळांतून वर्गावर्गातून

पिढ्यांचं बांधकाम करत असतो.

शांतपणाने सातत्याने

संस्कारांचे चारधाम पेरत असतो.

देशांच्या सीमांचा तो अदृश्य एक रक्षक असतो.

शिक्षक म्हणजे शिक्षक असतो

कधी शांत तर रौद्र कधी तो

स्थळ काळानुरूप बदलत जातो.

हसतो कधी कधी फसतो ही

गुंतून पडतो कधी उकलत जातो.

ध्येयनिष्ठ अन् जिद्दीचा स्वतंत्र त्याचा दंडक असतो.

शिक्षक म्हणजे शिक्षक असतो

अज्ञ जीवांना सूज्ञ करी जो

असा उपजत प्रज्ञावंत असतो.

विद्यार्थी विठ्ठल शाळा पंढरी

अभंग मनाचा एक संत असतो

ज्ञानाच्या उपासनांचा तो सच्चा साधक असतो.

शिक्षक म्हणजे शिक्षक असतो.

लोक उपेक्षा कुत्सित हसणे

सारे काही मनी पचवतो.

लाख शिव्या अन् अपमानित मन

तरीही कधी ना मागे सरतो.

समाज देतो कधी दूषणे निःशब्द तेव्हा प्रेक्षक होतो.

शिक्षक म्हणजे शिक्षक असतो.

कितीक कामे हिशेब न त्याचा

शौचालय ते जनगणना ही.

रोज खिचडी, टपाल तातडी

निवडणूका अन् पशूगणनाही.

साऱ्या ओझ्यांसाठीचे मस्तक होतो.

शिक्षक म्हणजे शिक्षक असतो.

वाद कुणाशी संघर्ष कधीही

इमानाचे ना साथ सोडतो.

रणी एकटा सदा झुंजतो

ज्याला त्याला पुरून उरतो.

सगळ्या विषयांचे समग्र जो एक पुस्तक असतो.

शिक्षक म्हणजे शिक्षक असतो.

संघटक ही राजकारणी

कधी कुणाला पाजतो पाणी.

तसा संयमी अन् छंदीफंदीही

अचूक जपतो राजाही अन् राणी

जुळवाजुळवी अशी करतो की

बाकी न कोणी शिल्लक उरतो.

शिक्षक म्हणजे शिक्षक असतो.

श्रीमंत नसे तो अहंभाव नसे त्या

माती मधून उगवून येतो.

सदा चालतो कधी न थांबता

आभाळाला झुकवून जातो.

अमृत त्याच्या शब्दांचे ऐसे.

विषवीर तक्षक घाबरतो

शिक्षक म्हणजे शिक्षक असतो.

अभिनेता, नेता, कलेक्टर, डॉक्टर

साऱ्यांची मूर्ती तोच घडवतो.

अजाण लेकरा श्रेष्ठ व्हायची

वाटाड्या होवून वाट दाखवतो.

भरकटलेल्या मार्ग दावण्या तोच

सदा मार्गदर्शक होतो.

शिक्षक म्हणजे शिक्षक असतो.

मुलांचे शिक्षण अन् एक घरटे

आयुष्य भराची इतकी कमाई त्याची.

यशस्वी होवून भेटे विद्यार्थी

हीच खरी दौलत स्थायी त्यासी

विद्यार्थ्यांचा विजय त्याच्या डोळ्यांत

 कृतार्थपणे ठळक झळकतो.

शिक्षक म्हणजे शिक्षक असतो!

 

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational