उठ शेतकरी राजा...
उठ शेतकरी राजा...
बळीराजाचं बळ काय असतं
दुनियेला दावू
उठ शेतकरी राजा आता
संपावर जाऊ...!! धृ!!
तुझ्या पोटाला लागंल जितकं
तितकंच पिकवायचं..
विकायला काही न्यायचं नाही
घरात साठवायचं..
काय खातंय हे जग तेव्हा
पाहूनिया घेऊ..!! 1!!
अन् उठ शेतकरी राजा आता..
गहू ज्वारी डाळ भाजी
पिकवलीच नाही..
गाडी बंगला जमीन जुमला
भूक भागवील का ही??
जाणून घे माणसा मोल मातीचे
नको माजूनिया जाऊ...!!2!!
अन् उठ शेतकरी राजा आता..
राब राबूनी जीवन सगळं
मातीतच सरलं..
माथ्यावरच्या कर्जाविन ना
हाती काही उरलं..
कर्जाचा हा डोंगर नदीनाल्यात
बुडवूनिया येऊ..!!3!!
अन् उठ शेतकरी राजा आता..
कितीक दिस तू आणिक असा
कुथशील रडशील..
गुन्हा काहीही ना करता उगीच
फासावर चढशील??
चल दारिद्र्याचा फास गळ्यातील फेकुनिया देऊ..!! 4!!
अन् उठ शेतकरी राजा आता..
मागण्या मान्य करून घेण्या
संप कुणी करते..
बिनकामी लोकांचे पाय मग
सत्ताही धरते..
आपल्या घामावर जगणाऱ्यांचे तंत्र शिकूनिया घेऊ..!!5!!
चल उठ शेतकरी राजा आता..
तुझी कुणाला पर्वा नाही
सारखेच सगळे
सत्तेपायी भांडण त्यांचे नंतर
गळ्यामधे गळे..
धडा शिकवाया साऱ्यांनाच आता
एकजूट होऊ..!!6!!
चल उठ शेतकरी राजा आता..
युद्ध हे आता पुकारले मी
थांबणार नाही..
हक्कासाठी आलोय पुढे आता
हटणार नाही..
अंगावर जो येईल त्याला
शिंगावर घेऊ..!!7!!
चल उठ शेतकरी राजा आता
संपावर जाऊ..!!
शिरीष पद्माकर देशमुख
मु. मंगरूळ ता.मंठा जि.जालना
मो 7588703716
