शीर्षक :- थोडं विसावू पाहते...!
शीर्षक :- थोडं विसावू पाहते...!
धांदलीत रोजच्याच
रोज सांधत जोडते
थोडे रांधून जराशी
थोडं विसावू पाहते
रोज थोडे हासण्यास
किती अश्रू मी मोजते
सुख चांदण्या झेलण्या
जीव पणाला लावते
माझ्या पोळल्या मनाला
मीच फुंकर घालते
थोडा जपण्या गोडवा
कडू सारेच साहते
जेव्हा चंद्राची सावली
माझ्या दारात झुकते
कोपर्यात लपलेली
तेव्हा बाहुली रूसते
माझ्या घराची कवाडे
जेव्हा लावूनीया घेते
तेव्हा मनीचे आठव
मनामध्ये ते कोंडते
सारे कोवळे लाघव
मुठीतून मी गाळते
आणि रात्री काळोखात
मीच चांदणीही होते
जरी धांदल रोजची
स्वत: जगूही पाहते
अशी घाईत तरीही
थोडं विसावू पाहते
सौ.प्रज्ञा घोडके,पुणे©®
