शहर
शहर
हे शहर
नि आकाशाचे चुंबन घेणाऱ्या
इथल्या उंचच उंच इमारती
ऐशारामात झिंगलेले रंगेल बंगले
अन् लोहमार्गाच्या कुशीत जगणाऱ्या
झोपड्या, पालन नि उघडे नागडे मानवी मनोरे
जळत्या आयुष्याच्या धगधगणाऱ्या
आगीनं बेचिराख होत असलेलं !
मला नेहमी वाटतं,
या शहराला असावा एक सुंदर चेहरा
संथ वाहणाऱ्या कृष्णामाईसम... शांत , नितळ
खळखळणाऱ्या ओहळासम... अवखळ !
पण कदाचित,
या शहराचा जन्मच मुळी
अश्वथाम्याच्या कपाळ जख्मेसारखा... शापित
एकलव्याच्या अंगठ्यातून भळभळणाऱ्या रक्तासम... उपेक्षित
भरल्या दरबारात द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना
पाहणाऱ्या पांडवांसारखा अगतिक , लाचार नि विवश !
