स्टॅचु
स्टॅचु
एक मन माझं,
हंबरतंय, आक्रंदतंय,
अन् म्हणतंय,
रंग उधळूया चला आनंदाने...!
रंग बरसे...भिगे... चुनरवाली...
या गाण्याच्या तालावर ,
मदमस्त होऊनि नाचूया !
पण,
दुसरं मन म्हणतंय,
अरे ! डोळ्यासमोरुनि तरळतंय,
कोरोना महामारीचा हैदोस...!
माणसांच्या मृत्यूचे तांडव...!
उद्वस्त झालेली, होत असलेली कुटुंबे...!
नौकरी गेल्यानं खचलेल्या माणसांचे चेहरे...!
उपासमारीनं मरणारी कित्येक गरीब माणसे...!
मग या विचाराच्या द्वंद्वात ,
तुम्हीच सांगा , मित्रांनो !
मी कसा काय रंग उधळू ?
नि रंग बरसे या गाण्यावर....
मदमस्त होऊनि कसा नाचू ?
मी संवेदनशील मनुष्य,
निसर्गराजाला एकच प्रार्थना करतोय,
या महामारीपासून लवकरच,
जगाची सुटका होवो !
थिजलेल्या, गोठलेल्या, साखळलेल्या,
जगाच्या विकासाच्या धमन्या,
मानवी कल्याणाच्या वाहिन्या,
नव्या जोमाने पुनर्प्रवाहित होवोत ,
अन् निसर्गाने विकासाला केलेला स्टॅचु
आपोआप 'स्टॅचु ओव्हर' होवो !
