एकटाच
एकटाच
'आम्ही आहोत ना!' म्हणणारे
आता हळूहळू विरळ होत होते
दारिद्र्याने ओतप्रोत भरलेले आभाळ
डोईवर पेलणारा, मी एकटाच होतो
अमावस्येच्या गडद काळ्या रात्री
नयनांचे काजवी दिवे करुनी
अंधार चिरणारा, मी एकटाच होतो
पौर्णिमेच्या शुभ्र प्रकाशात समुद्राच्या
बेधुंद, खोडकर लाटांना झेलणारा
सागरी किनारा, मी एकटाच होतो
नदीनाले, दऱ्याखोऱ्यातून हिंडताना
अन् घनदाट जंगले तुडवताना
स्वापदांशी लढणारा, मी एकटाच होतो
नातीगोती अन् जिवलग साथी
सारेच या मायावी नगरीचे बंदीवान
वार्धक्याच्या अगतिक, लाचार सायंकाळी
मृत्यूशी झुंजणारा, मी एकटाच होतो
