आई
आई
तात्यांच्या आजारपणामुळं ऐन दुष्काळात
आई, तुला झुंजावं लागलं एकटीलाच
पाचवीला पुजलेल्या भयाण दरिद्र्याशी
तारेवर ढोलकं वाजवणाऱ्या डोंबाऱ्यावाणी!
घेतलंस तू हाती टिकाव, खोऱ्या नि पाटी
अन् निघालीस मर्दासारखी बराशी काढायला
सरकारच्या दुष्काळी ' धडक योजनेत '
आमच्या पोटाची खळगी भरण्यासाठी !
रणरणत्या उन्हाच्या भाजत्या खाईत
खंदत होतीस टिकावानं... हिम्मतीनं,
भरत होतीस पाटीत खोऱ्यानं माती
अन् वहातही होती तूच टाकण्यासाठी!
घामानं डबडबलेल्या तुझ्या अंगाला
चिकटलेली माती चमकत होती... हिऱ्यावाणी !
अन् नकळतपणे कोरलं गेलं मज हृदयी
तुझ्या अपरिमित कष्टाचं चिरंजीवी शिल्प !
दारिद्र्याच्या जूनेराला दंड घालता घालता
आई , तुझा जीव मेटाकुटीला येत होता
तरीही चेहऱ्यावर उसणं हास्य आणून
धीर देत तू म्हणायची,' सरतील हेबी दिस !'
तुझा अथक,अखंड कष्टाचा खरखरीत हात
मायेनं जेव्हा माझ्या डोक्यावर फिरतो
तेव्हा प्रचंड ऊर्जा संचारते माझ्या सर्वांगात
गरुड झेपेनं आसमंत पादाक्रांत करण्याची !
