शेतकरी राजा
शेतकरी राजा
(अष्टाक्षरी)
शेतकरी राजा माझा
रोज राबतो शेतात
धान्य पिकवतो तेव्हा
घास जगाच्या मुखात
थंडी, वादळ, वाऱ्याची
तशी ऊन, पावसाची
पर्वा नाही केली त्यानं
कधी स्वतःच्या जीवाची
निसर्गाची अवकृपा
कधी पाऊस रुसतो
आली लहर रागाची
अवकाळी बरसतो
पीक बरे आले तरी
भाव होती खूप कमी
स्वप्न मोठे बघितले
त्याची कुठे आहे हमी
सर्व जगाचा पोशिंदा
माझा शेतकरी राजा
त्याच्या जीवावर होई
जगी सर्वांचीच मजा
