शेजारी
शेजारी
पारिजातक माझ्या अंगणी, फुले पडती शेजारी
गुलाब फुलतो दारात , पाकळ्या पडती शेजारी...
सुगंधित होऊन वारा, परिमल वाहे पलिकडे
घर अंगण सोडून, ओले पडती शेजारी...
चुलीचा विस्तव माझ्या, सारखा जाई उल्याकडे
अर्धी कच्ची भाकरी , ओरडे पडती शेजारी...
शब्द शब्द मोजकाच, आवाज घुमतो सगळीकडे
कान असावे भिंतीला , ओरखडे पडती शेजारी...
उष्ण वारा बाहेरचा, आत येतो कसा गडे
मी सोसते झळा उष्ण, कोरडे पडती शेजारी...
नळावर होते जलसा, मलाच भरू दे घडे
पाण्याच्या त्या युद्धात, तडे पडती शेजारी...
कालवाकालव मनी असे, येई सारखे रडे
अश्रुंचा ओघ आवरता, सडे पडती शेजारी ...
भूंकती श्वान दारात माझ्या, दुस-यास न आवडे
भुकेलेल्या माणसांमुळे , ओरडे पडती शेजारी ..
मी होरपळत दूःखात, ते कोरडेच्या कोरडे
मलमपट्टी खुप केली, खपल्या पडती शेजारी
खुप झाला हा अनुभव, नको झाले वाभाडे
सारखे डबडबती डोळे, साकडे पडती शेजारी
आज माझ्याच सावलीशी, झाले माझेच वाकडे
गुंतागुंत सोडविली तरी, आकडे पडती शेजारी ..
