सेलिब्रिटी असावं लागतं
सेलिब्रिटी असावं लागतं


सुशांत झाला शांत
याचं मलाही वाईट वाटतं
एक मात्र खरं
भाऊ न्याय मिळविण्यासाठी
इथं सेलिब्रिटी असावं लागतं
टीव्ही पेपरवर राजकारणाचा
जोमात चाललाय धंदा
हरवून गेला बातम्यांत यांच्या
मायबाप जगाचा पोशिंदा
कर्जबाजारी अन् नापिकीने
त्याला रोजरोज मरावं लागतं
भाऊ न्याय मिळविण्यासाठी
इथं सेलिब्रिटी असावं लागतं
अरे कोपर्डीची ताई ती
काय म्हणत असेल
बलात्काराच्या बातम्या पाहून
आजही कण्हत असेल
आजही सुरक्षित नाही स्त्री
याचं दुःख मनात दाटतं <
/p>
भाऊ न्याय मिळविण्यासाठी
इथं सेलिब्रिटी असावं लागतं
दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी
यांचा काय होता गुन्हा
समाजासाठी लढले ते
दररोज नव्याने पुन्हा
अपराध्यांना शिक्षा नाही
याने आजही मन झुरतं
भाऊ न्याय मिळविण्यासाठी
इथं सेलिब्रिटी असावं लागतं
अरे सीमेवरती रात्रंदिस
माझा सैनिक आहे उभा
सुरक्षित आहोत आपण
मिळते आनंदाची मुभा
शहीद होतो तो रक्षणकर्ता
तेव्हा वरवरचं प्रेम दाटतं
भाऊ न्याय मिळविण्यासाठी
इथं सेलिब्रिटी असावं लागतं