मी ऊसतोड्या
मी ऊसतोड्या
घरदार-सोडून, मुलांची शाळा तोंडुन गाव-गाव करत फिरत असतो.
एकवेळेच खाऊन उन्हातान्हा उसाच्या चिपाटात झुरत असतो.
अंगावरच्या जखमा आणि पोटाची खळगी भरण्यासाठी केलेली धडपड ही
जीवाहून मुल्यवान वाटु लागते तेव्हा
जेव्हा ऊसाच्या पातीखाली बसलेलं माझं तान्हं बाळ आकाशा कडे बघत
उंच भरारी घेताना दिसते,
उपचार जणु आम्हाला माहीतीच नाही.
झाल्या जखमा अपार तरी कष्ट करायला
आम्ही नवरा-बायको घाबरत नाही.
कोयत्याला धार नाही जेवढी तेवढी उसाच्या पातीला
रात्री झोपताना लाही-लाही होई पाठ धरतीवर लोळताना.
सण-समारभं आम्ही एवढे कधी साजरे करू शकलोच नाही
घरात नाही दिवा म्हणून दररोज दिवाळी आमच्या सारखी दुसरी कोणी करू शकत नाही.
मातीच्या कुशीतच आमचं नशीब जन्माला येतं
नाही डॉ.नाही सलाईन, नाही कोणती गोळी,
बाळाची नाळ तोडायलाही कोयत्याची धार उभी
उसाची गोडी आणि झाडाची सावली
उभ्या आयुष्याची कोडी सोडूवून जाते
ती आमची काळी माती माऊली......
