अनोळखी
अनोळखी
अनोळखी नजरा सार्या, अनोळखी भास
अनोळख्या वाटेवरचा चालला प्रवास
फूल जरी आपले होते
आपुली ही बाग
जाळूनीया सारे गेली
कसली ही आग
घरट्यातही नाही जागा, आता बहरास
अनोळख्या वाटेवरचा चालला प्रवास
लुटले हे त्यांनी सारे
उरले ना काही
कुठले मी आणू तारे
आकाशही नाही
जीव होई कासावीस हा, गुदमरतो श्वास
अनोळख्या वाटेवरचा चालला प्रवास
हृदयावर घालून घाला
आप्त करी घात
कधी आधारासी आला
अनोळखी हात
वाट होई ओळखीची अन् पुन्हा मनी आस
अनोळख्या वाटेवरचा चालला प्रवास
