सावर रे मना
सावर रे मना
तुझे बंधनं
कळत का नाही मला!?
तुझी होणारी तगमगही
दिसते रे मला...
या जग-रहाटीने
सोडलय का कुणाला!?
पण नियमांच्या पारड्यात
तोलायचं कसं मनाला?
काय चूक काय बरोबर
कळत का नाही मला!?
तुझं वागणं शंभर अंशी
पटतय रे मला...
असली गणितं सोडवता
आलीय का कुणाला!?
पण उत्तराच्या पेचात
गुदमरतं रे मनाला!
तुला कुणी काही सांगावं
हे शोभतय का मला!?
तुझं जगणं मनमौजी
आवडलय रे मला...
तयार साच्यात बसवता
येणार आहे का स्वतःला!?
मग बंड करायला घाबरून
दुखवायचं का मनाला?
तुझ्या नजरेतले भाव
माझं मन वाचतय
मनाला आवर घालणं
मलाही समजतंय...
तुझं नि माझं नातं
दुसऱ्याच् जगातलं भासतय
कळतं रे सारं तरीही
मन तिथेच भरकटतय...
मलाही तुझ्यासारखं
आवर घालायला शिकव
जाणून बुजून सगळं
विसरायला शिकव
समोरासमोर असं
अनोळखी राहायला शिकव
तुझ्या नि माझ्यातलं
अंतर बघायला शिकव
मनाला समजावून
तटस्थ जगायला शिकव...

