मापदंड
मापदंड
बाईपण म्हणे आईपण
घालावी मायेची पाखरण
सहनशीलतेचे प्रतीक!
हवे क्षमाशील आचरण
घेऊनी नानाविध भूमिका
माता कांता कन्या वा बहीण
धारूनी बंदिनीचाच वेश
जपावे कसोशीने स्त्रीपण
उमटवित कर्तृत्व-ठसा
राखावे घराचे घरपण
आकारावित खुशाल स्वप्न
वाहुनी संसाराला स्व-पण
ऐकावीत जहाल वचने
करिता भिन्न मार्गक्रमण
गिरवावी नारीची महती
चौकटीतले शहाणपण
लीलया पेलतसे ललना
अपेक्षांचे हे समीकरण
साकारे नवदुर्गा अबला
नको चाकोरीबद्ध मापन
मर्यादा पुरुषोत्तम राम
वदले वाल्मिकी रामायण
का सीतेच्या अग्निपरीक्षेचे
कलियुगात उदाहरण !?
🔸🔹🔸💠🔸🔹🔸🌿
*स्वप्ना साधनकर*
(मुंबई)
