पाठलाग
पाठलाग
पावसाचा हा संततधार अवतार
अन् तुझं, एक अनामिक नातं
हळूहळू उलगडू लागलंय मला...
दोघंही येताना घेऊन येतात
सुसाट वादळ आपल्या सोबतीला
नीट आवरून सावरून ठेवलेल्या
आठवणींना पसरवायला परत
त्या सावडायला धावत सुटलेलं
मन होऊन जातं उधाण वाऱ्याचं
त्याच्या उचंबळलेल्या भावनांना
शांत करण्याच्या आवेशात मग
बेधुंद करतं गंधाळलेलं देहभान...
कुणीच जुमानत नाही
अगदी हृदयातील स्पंदनं देखील
एक वेळ होती जेव्हा ह्यांच्यावर
गाजत होतं तुझंच अधिराज्य
तेव्हा सवय होती ह्यांना
तुझ्या नजरेतील बाण झेलायची
आता काळजाची होणारी ही घालमेल
सोसवतही नाही अन् सोडवतही नाही
मृदगंधित क्षणाची उजळणी करणं...
मोहरून काया कस्तुरीने न्याहलेली
प्रेमरूपी सागरात पूर्ती बुडालेली
पण त्यातून सावरायला होता
तुझा किनारा,.. तुझ्याच लाटा
होत्या पांघरलेल्या म्हणून निर्धास्त
ओसरल्या त्या ओझरत्या काळचक्रात
प्रेम मात्र पाठलाग करतच आहे कदाचित...
🔸🔹🔸💠🔸🔹🔸🌿
*स्वप्ना साधनकर*
(मुंबई)
