अशी नटली नवरी
अशी नटली नवरी
1 min
17K
सजनाच्या स्वागताला
डोई बाशिंग बांधले
सुखी संसाराचे स्वप्न
जणू डोळ्यात भरले
नथ नाकात मोत्याची
कशी खुलून दिसते
अंगच्याच सौंदर्यात
भर अजून घालते
अंगी हळद लावता
रूप गोजिरे फुलते
मेंदी हाताची रंगते
कळी मनाची खुलते
कसे रोखीयले डोळे
वेध जणू भविष्याचा
भासे घेतसे अंदाज
तिच्या सुखी संसाराचा
मनी दाटले काहूर
कसे असेल सासर
मनातला भाव जणू
सांगे लाजरी नजर
लाल चुटूक हे ओठ
जशी डाळिंबाची फोड
शब्द त्यातून निघता
लागे कानाला ते गोड
काळजात धडधड
उठे मनी शिरशिरी
थोडी लाज, हुरहूर
अशी नटली नवरी