सांगा बाबा
सांगा बाबा
लहानपणापासूनच केले तुम्ही संस्कार, घडवलं मला
ओळख करुन दिली माझ्या दोन मित्रांशी-ज्ञान आणि कला
हुशार होतो मीही आत्मसात केलं सगळं
राहिलंच काय होतं मला शिकण्यासारखं वेगळं?
नियतीच्या नव्हतं मनात मी तुम्हाला अभिप्रेत वागू
सांगा बाबा मी कुठल्या तोंडाने माफी मागू?
काॅलेजला झालं अॅडमिशन म्हणजे मला वाटलं जिंकलं सारं
पैसा होता खिशात आणि हुशारीचं वारं
गर्लफ्रेंड आणि मित्र एवढंच होतं माझं जग जसं
उधळायचो पैसा कसाही मन म्हणेल तसं
आतापर्यंतचा हिशोब कुठल्या कॅल्क्युलेटरवर करुन सांगू?
सांगा बाबा मी कुठल्या तोंडाने माफी मागू?
दारु सिगारेट काॅमन होतं आठवतो आजही पहिला पेग
शूज, कपडे, गाॅगल आणि मोटारसायकलचा वेग
हुशार म्हणता म्हणता टुकार कधी झालो कळलंच नाही
या सगळ्यात रमलेलं मन पुन्हा अभ्यासाकडं वळलंच नाही
बेरोजगार आहे आज तुम्हीच सांगा कुठं नोकरीला लागू?
सांगा बाबा मी कुठल्या तोंडाने माफी मागू?
