साकंव
साकंव
फुले अंथरुण
वाटेवर माझ्या
सुगंध होवून
दरवळत राहिलीस!
काटेरी पुंजके
पदरास बांधून
सलं भोगलस,
ओलावा होवून
मुळापर्यंत रुजत गेलीस!
स्वातीच्या थेंबाएवढी
पारदर्शी होवून
माझा अस्त-व्यस्त
पसारा झाकून घेतलास!
आश्वासक सावल्यापासून
दूरावलेला मी
तुझ्या मायेच्या पदराखाली
चांदणे लपेटून
शीतल झालो.
आता
तुझ्यापासून माझ्यापर्यंतचे
प्रेमाचे हे साकवं
असेच घट्ट विणलेले राहू दे
सात जन्मापर्यंत!

