झाडे लावू या...
झाडे लावू या...
झाडावर खोप्यातली
पिल्लावळ रडतयं,
झाडे सुकली उन्हात
पान पान गळतंय.
ऋतू हिरव्या रंगाचा
कुठे गेला फुलणारा,
कसा पाऊस येईना?
वाऱ्यासंगे झुलणारा.
पिल्लं विचारी आईला
असं का ग घडतंय?
ऊन, वारा, पाऊस का?
क्षितिजाला अडतयं.
आई सांगते पिल्लांना
निसर्गाची नाही चूक,
वृक्ष तोड केली सारी
माणसाला 'स्वार्थी' भूक.
झाडे सगळी तोडून
कसा पाऊस येईल?
गर्द हिरवा निसर्ग
कसा बरं का राहिलं?
यावर एक उपाय
झाडे लावून जगवा,
माणसांने सर्वांसाठी
असा काढावा फतवा.
पण,बाळा असे काही
कुणी नाही करणारं,
हे काम सर्व मिळून
करावेच लागणारं.
निसर्गाला जपायला
पुढे आपण होवूया,
बिया घेऊन चोचीत
रानावनात टाकू या.
तेंव्हा आपला निसर्ग
सजीव सृष्टी वाचेल,
पानं, फुलं, चराचर
प्रत्येक जण हसेल.
