रक्षाबंधन एक चिंतन
रक्षाबंधन एक चिंतन
नात्यातील ओल मूळी संपते कशी कळत नाही
सरपण ओलं म्हणे कधी चूलीत का जळत नाही
नात्यांना त्या नाव द्यायला ही जीभ वळत नाही
पाहून कुत्र्याला डोळस तरी कधी पीठ दळत नाही...
सामोपचार घडवणारा योग्य मार्गच मिळत नाही
स्वत: मेल्या शिवाय कधी स्वर्गच कळत नाही
दुराव्यास अहंपणा खेरीज नसते काही फार
दुस-यास कमी लेखण्यातच होते सीमा पार
आपुलकी, जिव्हाळाही मग ठरू लागे भार
प्रेमअन ममता होऊ जातात हळूहळू पसार
नाते संबंध जपणंच वाटतं बिन कामाचं ओझं
नाजूक रेशीम धाग्यांत गुंताच का होतो रोजं
भावाच्या भेटीसाठी बहिणंच का होते वेडी?
नणंदच का ठरते वहिनीच्या पायातील बेडी?
आई बापाच्या ह्रुदयी मुलांसाठी पडे पीळ
भार सूनबाईस वाटती जणू ते प्रगतीस खीळ
भावाभावांमध्ये असता रक्ताचे एकच नाते
बायका आल्यावरच पार लयाला का जाते?
नात्या नुसार आपल्याला फिरावे लागते गोल
फोलच ठरते नाते आटता ह्रुदयातील ती ओल
आईवडिलांंवरचं प्रेम तरी राहतं का टिकून?
नाते सबंध कसले पोरं लाज टाकती विकून
बंधूच्या करी राखी बांधून होई भावांचे औक्षण
धन्य तो भाऊ जो सदैव करतो बहिणींचे रक्षण
राहो देवा बहिण भाऊ जणू तारका नि ग्रह
कर भस्म सारे अमंगळ व नात्यांमधील दुराग्रह
