रे प्राजक्त फुला
रे प्राजक्त फुला
पाहिलं तुला पडतांना, ओघळत्या प्राजक्त फुला
कोसळला रे क्षणातच, माझ्या स्वप्नांचा झुला
उठले तरंग कितीतरी, माझ्या भावविभोर मनात
मोहोळ अगणित विचारांचे, साचले रे डोक्यात
कल्पवृक्ष प्राजक्त फुलाचं, ऐन भरात निखळणं
जाणवलं रे देहाचं, असं च नाशिवंत असणं
हसत हसतच केला त्याने, देह भूचरणी अर्पण
सांगून गेला कुणीतरी, करणं जरूरी समर्पण
सांगून गेला तो मला, जीवनाचा अर्थ खरा
स्मरतो मला ओघळतांना, त्याचा चेहरा हसरा
जाता जाता ओंजळ माझी, तो गंधाळून गेला
कर्तृत्वाच्या किर्तीचा, मला धडा देऊन गेला
