रात्र
रात्र
दूरवर डोंगरावर छोटे छोटे दिवे दिसतायत. काही लुकलुकतायत, काही शांत तेवतायत. सगळीकडे तूच भरून राहिली आहेस. ते दिवे मला जरी छोटे दिसत असले, तरी त्यांना त्यांच्या जागी त्यांचं अस्तित्व आहेच की ! अन् तूही सगळ्यांची अस्तित्वं मोठ्या मायेने पोटात घेतेस. यालाच "आभाळमाया" म्हणत असावेत का गं ? हो बहुतेक..
ते बघ ! दूरवर कुठेतरी एक ट्रक सुरू झाल्याचा आवाज आला.. तो बघ दूर डोंगरावरचा एक दिवा मावळला गेला ! किती विरोधाभास आहे ना दोन घटनांमधे ! एक सुरुवात.. एक शेवट.. दोन्ही एकाच वेळी..! पण तू मात्र सगळीकडे तटस्थ नजरेनं बघतेस ! म्हणूनच तू मला आवडतेस..
आहेस तशीच आहेस गं तू अजून.. शांत, सौम्य, निर्व्याज! काहीच बदल नाही तुझ्यात..
का नाही बदललीस तू ?
की बदलावसंच वाटलं नाही तुला कधी ? सांग ना..
अशी कशी गं तू ? इतकी अबोल !
इतक्यात एक मंद वाऱ्याची झुळूक आली...
ती माझ्याशी बोलायाला लागली ! त्या स्पर्शातून... !
इतकं मोठं आभाळ व्यापून राहिलेली ती ! तिनं माझ्याशी बोलायला वेळ काढला हीच किती मोठी आणि 'मीठी' गोष्ट !
आता फक्त ती आणि मी !
ती माझी... मी तिचा...
माझी... रात्र... !!!

