पुरवा मला संरक्षण
पुरवा मला संरक्षण
जन्माला येण्याआधी माझ्या
उठते 'प्रश्नचिन्ह'
माझ्या येण्यानेच होतात
काही चेहरे खिन्न
सुंदर दिसणं कधी
बनतो माझ्यासाठी शाप
हैवानापेक्षा हैवान निघतो
जन्मदाता बाप
शिकली मी कितीही वा
कवेत घेतले अवकाश
शंका घेऊन म्हणतात कसे
प्रगती आहे सावकाश
रात्र असो वा दिवस
माझ फिरण ठरलय शिक्षा
का नाही दिली जात मला
मंत्र्यांसारखी 'झेड' सुरक्षा
'रजस्वला असणे' हा तर
माझा खरा अभिनिवेश
त्यामुळेही मला किती ठिकाणी
नाकारला जातो प्रवेश
नोकरी करते घर सांभाळते
तरी जगणे ऐसे कैसे
साध्या लघूशंकेसाठी मला
रोज मोजावे लागतात पैसे
कमी मी कुठेच नाही
ठावे आहे सगळ्याला
म्हणून घाव घालता मर्मावर
ठावे आहे मला
मान्य आहे मला सर्वत्र
दिले आहे आरक्षण
विनंती एकच
जिथे जिथे मी जाईल जिथे
पूरवा मला संरक्षण
पूरवा मला संरक्षण !
..............................................................
