तू म्हणे...
तू म्हणे...
पत्रावळीच्या ढिगाऱ्यात
उष्टा खरकटा अर्धामुर्धा
बुंदीचा लाडू
शोधणाऱ्या हातांसाठी...
माती पांघरूनही खूप दिवस झाले
तरी तो आला नाही म्हणून
मातीचे कफन
ओढू पाहणाऱ्या बियांसाठी...
जत्रेत गर्दीत हरवलेल्या
संवेदना व वेदना
या भगिनींची
भेट घडवून देण्यासाठी...
शिकवणीला फी नाही म्हणून
भिंतीआड उभा राहून
कानात प्राण आणून
शिकणाऱ्या पुस्तकासाठी...
प्रवासात चालतांना
काट्याच्या टोकांवरती
पाय ठेवत पकडापकडी खेळणाऱ्या
'आशे'च्या लेकरांसाठी...
चालढकल करणाऱ्या 'नम्रते'ला
वेळकाढूपणा करणाऱ्या 'यश'ला
इंचभर वाढलेल्या 'इर्षे'ला
प्रामाणिकता शिकवण्यासाठी...
वाळीत टाकलेल्या गावाला
गावकीत आणण्यासाठी
व भेदरलेल्या शहराला
पुन्हा अभेद्य करण्यासाठी...
माझ माझ म्हणवणाऱ्या
माझ्या माझ्या माझ्यामध्ये
माझं असं शोधणार्या
माझ्यासाठी...
तुला मी कित्ती शोधत होतो
पण या सर्व गर्दीत
तू म्हणे
'मला'च शोधत होता!
