प्रश्न पडलाय तिला
प्रश्न पडलाय तिला


प्रश्न पडलाय तिला
नक्की,
काय साजरा करतोय आपण
महिला 'दिन' की
महिला 'दीन'...?
महिलादिनीच पिटली जाते हो
स्त्री सबलीकरणाची दवंडी
पण खरचं
उतरली आहे का तिच्या माथ्यावरील
अपेक्षा, रूढी परंपरा, रीतिरिवाज, कर्तव्य अन
बंधनांची उतरंडी...?
गजरा, टिकली, पैंजण, हार
हा तर आहे स्त्री शृंगार
पण लावून त्याला प्रथांची लेबले
का करताय तिला त्याचा डोईजड भार...?
शारीरिक निकषावर नेहमीच जोखली जाते
स्त्री जातीची सबलता
पण कधी पाहिली जाईल का
तिची वैचारिक, बौद्धिक, मानसिक आणि
आर्थिक प्रगल्भता...?
शिकून सवरून जरी ती झाली शहाणी
तरी का वेळे आधीच खुडली जातेय कोवळी कळी
खेडोपाडी आजही बघा
बालविवाह, हुंडा, व्यसन, अन अत्याचारास
ती बिचारी का पडतेय बळी...?
ज्या मातीतून उपजली
इंदिरा, सावित्री, कल्पना, आनंदी, बहिणाबाई आदी
रत्ने अपार
त्याच मातीत रोज एका निर्भयाची
का होतेय निर्घृण हत्या अन बलात्कार...?
वेशभूषेवर ठरतेय इथे तिच्या
संस्कार अन चारित्र्याची उंची
बाळकडू नैतिकतेचं अन का नाही पाजली जात त्यालाही
जन्मतःच संस्काराची गुट्टी...?
आपण बाई... बाई माणूस!
गड्यांची बरोबरी कशी करावी
घरोघरी गिरवली जातेय आजही
तिच्या मनावर ही असमानतेची बाराखडी
तुम्हीच सांगा आता ही
कशी भरावी
स्त्री पुरुष असमानतेची दरी...?
व्यक्तिमत्वास तिच्या जरी पडले पैलू हजार
प्रत्येक स्तरावर तावून सुलाखून
जरी ती उजळली आरपार
तरीही नर अन मादीच्या चौकटीत ती
का जखडली जातेय वारंवार...?
स्त्री निसर्गाचा सुंदर आविष्कार
साऱ्या सृष्टीच्या सृजनाचा मूळ आधार
तरीही तिला का मागावा लागतोय
तिचा हक्क आणि अधिकार...?
प्रश्न पडलाय तिला
खरचं बदलली आहे का परिस्थिती की
आजही आहे महिला 'दीन'
मिळतील तिला या साऱ्या प्रश्नांची उत्तरे ज्या दिनी
तोच खऱ्या अर्थाने असेल महिला 'दिन'
समाप्त.
या कथेच्या प्रकाशनाचे आणि वितरणाचे सारे हक्क लेखिकेकडे राखीव. कथेत अथवा कथेच्या नावात किंवा कथा लेखिकेच्या नावाशिवाय आढळून आल्यास तो कॉपी राईट कायद्याचा भंग मानला जाईल. कथा जशीच्या तशी शेअर करण्यास काहीही हरकत नाही.