अजून आहे जगणे बाकी
अजून आहे जगणे बाकी


सरता सरता सरून गेले
साल तारखा महिने अन क्षण
सय मधुर मनी वांझ वेदना
उरले काही कायमचे व्रण
झाले गेले जुने पुराणे
काळावरती तयांचे ठसे
रुतून बसती आत खोलवर
क्षणिक जरी हे आयुष्य असे
सुखदुःखाच्या तयार पिशव्या
घेऊन काळ उभा तिठ्यावर
स्वच्छ लकेरी सुरेख गातच
हुकूम त्याचा सर आँखो पर
अस्तांचलास जाता गभस्ति
काजवा प्रकाश गीत ऐकवी
पुढ्यात दर्पण नव आशेचे
अभावातही भाव दाखवी
किती सोसिले किती भोगिले
हिशोब उगाच जाता मांडू
अजून आहे जगणे बाकी
लय श्वासांची पाहे सांगू