जगणं
जगणं


गोठतात संवेदना अन्
हरवून जातं भान
सापडत नाही
जाणिवांची कळ शोधूनही...
भळभळत राहते एक सल
अश्वत्थाम्याच्या जखमेसारखी
अविरत...
होतो राग राग स्वतःचा आणि
स्वतःच्या जगण्याचाही
घ्यावं वाटतं कवटाळून
मनात दडलेल्या साऱ्या घालमेलींना अन
कुरवाळून प्रेमाने
शब्दांच्या टोकदार सुईने
काढावं बाहेर जखमांना आणि
होऊ द्यावं मुक्त
मनातल्या घुसमटीला...
फोडून बांध आसवांचा
उघडावी बंद कवाडं अन
रुजू द्यावा गर्भ
स्वानंदाचा...
उजळून जावं लख्ख
अंतर्बाह्य अन्
होऊ द्यावं सोनं जगण्याचं...