जगताना
जगताना


अंतरंगाच्या निःशब्द कुपात
दाटून येतात गंधभारीत आठवणींचे कढ
तर कधी ऐकू येतात उमाळयांचे उसासे
असतात काही दुखऱ्या जागा
खोल आत रुतलेल्या
प्रत्येकाचे संदर्भ निराळे अन तपशीलही...
भावनांचे निनाद जपत
चारचौघांसारखं जगताना
लपवता येत नाही मनात दीर्घकाळ
अव्यक्त भावनांची ओल अन स्निग्धता
मग ओलांडल्या जातात आपसूकच
प्रकटिकरणाच्या मर्यादा...
निसटणाऱ्या प्रत्येक क्षणासोबत
चालू असतो श्वासांचा
एक निशब्द प्रवास अव्याहतपणे
सोबतीला असणाऱ्या वस्त्या मात्र
सोडत असतात चार दोन सांत्वनाचे उसासे अन
होतात येणाऱ्या वसंताची भाकीतं करण्यात मश्गुल...
कोरल्या जातात मनपटलावर
जीवन जाणिवांच्या नितळ ओल्या नोंदी
आणि समृद्ध करतात दृष्टिकोनाचा परीघ
माजतो वास्तव संदर्भांतील अर्थ-अन्वयार्थाचा कोलाहल
त्यातच प्रतिबिंबित होतो मग स्वत्वाचा शोध
अन् विस्तारते जीवनदृष्टी...