प्रलय
प्रलय
क्षणोक्षणी वाढत जाणाऱ्या प्रलयंकारी पावसात
लुप्त होत जाणाऱ्या
घराच्या छतावरुन
नेहमी दिमाखात असणारं
खालचं शहर मी पाहिलं तेव्हा...
मंदिर... मस्जिद...अहंकार...
कशाचाच मागमूस नव्हता ..
हिरवा, निळा, पिवळा, केशरी...
कुठलेच रंग कुणाच्याच भाळावर
आता शोधूनही दिसत नव्हते
सारेच हरवले होते, वाहून गेले होते
रामाने बहुधा रहीमही थोपवला होता कुठेतरी
त्याच्याचबरोबर हे सारं पाहायला...
अन् दुसरीकडे, या भयंकर पुरात
दुसरेच रंग दिसत होते, खुलत होते
काही नव्याने जन्म घेत होते
बोटीतून आलेला खाकी... हिरवट...
नाव गाव काहीच माहीत नसलेल्याचा शोध घेणारा...
आपल्या जीवावर उदार होऊन
एक गव्हाळ, आपलं घर नि धान्याचं कोठार उघडून दिलं होतं
आत येणाऱ्याला कारणही न विचारता नि त्याचा पत्ताही
एक पवित्र, शुभ्र पांढरा
मिटल्या ओठानं... फक्त समोरच्याच्या जखमा पाहणारा...
बिनबोभाट त्यावर मलमपट्टी करणारा
मृत्यूच्या दाढेतून ओढून काढणारा
तहानभूक विसरून दिलेल्या वचनास जागणारा
आता तिथे महाराष्ट्र-कर्नाटक वादच नव्हता
अलमट्टीनं दोघांनाही सारख्याच तराजूत तोललं होतं
मदत मागणारा नि मदत करणाऱ्या हातावर
कुठल्याच धर्माचं, जातीचं नावच गोंदलं नव्हतं
एकच मानवतेचा झरा प्रत्येक हृदयात, प्रत्येकाच्या रक्तात वाहत होता
युगानुयुगांच्या कलहानंतर... माणसाच्या अक्षम्य अपराधाचं शासन..? की धडा ..?
'त्या'नंच उपाय शोधला बहुधा...
क्षणोक्षणी वाढत जाणाऱ्या प्रलयंकारी पावसात
लुप्त होत जाणाऱ्या घराच्या छतावरुन
जेव्हा खालचं शहर मी पाहिलं...
तेव्हा
महापूर... फक्त महापूर...
पाण्याचा अन् माणुसकीचा...
