माझी माय गं सावित्री
माझी माय गं सावित्री
माझी माय ग सावित्री
बाप ज्योतिराव फुले
ज्ञानगंगा आली दारी
मन चिंब चिंब न्हाले !!
झाली आंब्याची डहाळी
लेखणी हो तिच्या भाळी
झाली भुईचीच पाटी
शब्द फुटे गोड ओठी !!१!!
माझी माय ग सावित्री
किती कष्ट ते झेलले
शुभ्र वस्त्रावरी तिच्या
शेण चिखल फेकले !!२!!
माझी माय ग सावित्री
नाही पोटच ही पोर
तरी पाळणे हालती
अनाथाची आई थोर !!३!!
महा दुष्काळ पडला
उपासाने जीव जाई
तिने संसार विकला
भुकेल्याचा अन्नापायी !!४!!
क्रांतीज्योती ती सावित्री
धरी तिरडी हातात
दिला पतिसरणाला अग्नी
कोणी नाही इतिहासात !!५!!
घाली प्लेग तो थैमान
वाचवण्या धावे जन
जीव घातला धोक्यात
झाली प्लेगची लागण !!६!!
माझी माय ग सावित्री
झाली अनंता विलीन
पेटो घरोघरी ज्योती
पुन्हा व्हावी ती सावित्री !!७!!
