जय जय शिवराज की
जय जय शिवराज की
वीररस वाहतो, सूर्यमुख पाहतो
कोण म्हणे हा न तो,जाणता राजा
सह्याद्रीच्या कडा, गर्जतोय चौघडा
वाघाचा तो बछडा, शिवप्रभु माझा
इतिहास बोलला, काळ क्षणी थांबला
नरसिंह झुंजला, दाखवी तेजा
रक्त होते गोठले,नेत्री अश्रू साठले
कंठ उर दाटले, जगणे हीच सजा
षंढ भूमिपुत्र ते,थंड गलितगात्र ते
आदिल निजामाच्या चाटती पाया
मातेची हो निलामी,केली या सरदारांनी
अब्रू माय बहिणींची, देयी लुटाया
मुघलांचे ते घोडे ,उभे पीक करी आडवे
क्षणात कष्ट वर्षाचे ,जाई वाया
झाली राख रांगोळी, घुमे आर्त आरोळी
झाली रात्र काळी ,मागे मरण छाया
लखोजींची वीर बाला ,घेई हातात भाला
माथी संताप झाला ,मोगलाईचा !
थरथरला उभा देह , पाहुनी जुलमी दाह
कोरीले मनात घाव,घडविन स्वराज्याला
जाहली मंगल प्रभात, नाद उमटले नभात
शिवनेरीचा कणकण, धन्य झाला
रुद्र तो संहारकारी, शिव तो कल्याणकारी
जिजाऊच्या पोटी , शिवप्रभू आला
माती दगडात, बाळराजे कसे खेळती
पाय झोपडीत, थेट गरीबाशी नाळ ती
दांडपट्टा भाला, कधी नांगर ही हाकती
रयतेचा राजा, सारी लक्षणे ही बोलकी
स्वराज्याचा पाया, आता भरू होता लागला
आदील निजामाच्या, कबराही खोदल्या
रणभैरी वाजली, अन युद्ध शंख फुंकला
सूरुंग शिवबात, असा जिजाऊने पेरला
"शिवबा तू जरी सान, घे नीट ऐकून
ह्या भूमीच हो देन, आहे तुम्हाला
जरी जन्म मी दिधला, तरी तू जिथे घडला
मराठी माती तीच, मस्तकी लावा
बघा तो समोर किल्ला, चढवा जबर हल्ला
मोगलाईचा मनका, करा ढिल्ला
नाहीतर गुलामीचा, पांघरून तो शेला
कलंक घराण्या, तुम्हीच लावा"
जगदंब ! जगदंब ! फुटले स्वर कंठातून
रक्त रक्त उसळूनी,आले प्रत्यंगातून
पेटला उभा तो सिंह, आग फेकी नेत्रातून
लालबुंद झाला माथा, लावा जसा श्वासातून
मुठी गच्च आवळल्या, तलवारी खवळल्या
म्यानातून उसळल्या, रक्त प्याया
तांडव सुरू झाले, मावळे धावून आले
रायरेश्वराला, शपथ द्याया
"हे शंभू महादेवा ,रक्ताभिषेक घ्यावा
चाललोत कापाया गनिमांना
करंगुळी कापितो रक्त टिळा लावितो
आलो स्वराज्याची शपथ घ्याया"
हर हर महादेव एकच चित्कार झाला
मुर्दाड देहात लावा संचार झाला
एक एक मावळा घोड्यावर स्वार झाला
वीज कोसळे ऐसा जबरदस्त वार झाला
अश्वारूढ नृसिंह,छात्रतेज रणशूर
रुंद अफाट छाती ,बलदंड तो देह
करपुर गौरवर्ण,लखलखते ओजतव
दंशनारी ती जीभ , नजरेतून ती वीज
पाठीवरती ढाल ,हाती तीष्ण तलवार
महाराष्ट्राच्या भूमीत वीररत्न गावले
लढले जयासाठी जीवा उदार मावळे
हिंदवी स्वराज्याचे संस्थापन जाहले
भगवे तोरण तोरणा गडाला लावले
*लाथाडून गुलामीला वाचवली लाज ती*
*बोला सहस्र मुखे, जय जय शिवराज की !!!*
