प्रकाश हा सांत्वनीय
प्रकाश हा सांत्वनीय
ते गेले तेव्हा दिनकर
उदयाचली येत होता
पाहुनी आकांत सारा तोही
शोकगीत आळवीत होता !!
हे पित्यासाठीचे हुंदके
अन धाय मोकलून रडणे
त्यांचा हिरमुसला भाव
मम हृदयी ठाव घेत होता !!
पितृछत्र या लेकरांचे
इतुक्यातच का हरवले ?
हा प्रश्न माझ्या मनाला
सारखाच बोचत होता !!
मनी विचार लेकरांचा असता
मी ही ध्यानी आले मजला
वाटे दैवाने का ऐसा
ठेवा दिधला वैधव्याचा !!
कुणा चुके ना दैवगती ही
हो तूच बाप अन आई
जणू प्रकाशरुपानं सूर्य हा
माझे सांत्वन करीत होता !!
