फुलांची गंमत
फुलांची गंमत
एकदा ठरवलं फुलांनी
वाटूनीच टाकू या सुगंध
दरवळून जाई परिसर
होतील सारेजण बेधुंद
चाफा म्हणाला आधी
माझा सुटेल परिमळ
पहाटे मंदिरात जाता
नाकाने हुंगती दरवळ
प्राजक्त बोलला थांब
आहेस का रे तू वेडा
उठल्याबरोबर दिसतो
अंगणात माझा सडा
रातराणी लगेच वदली
माझाच सर्वत्र दरवळ
मध्यरात्रीपासूनच सुरू
माझी असतेय वळवळ
मोगराही काढुनी छाती
तोऱ्यातच जरा बोलला
खिडकीमधून घुसलेल्या
सुगंधानेच सखा फुलला
निशिगंध ही नाही अगदी
मागे जराही असा हटला
बोललाच तो अभिमानाने
मध्यरात्री गंध होता सुटला
इवल्या जाईजुई बिचाऱ्या
पडलेल्या सर्वांच्यात मागे
हळूच स्वरात बोलू लागती
हूंगता आम्हां होतात जागे
काट्यात अडकून डौलात
होते टप्पोरे गुलाबाचे फुल
तोडण्यास ललनेला त्याने
पाडली वेगळी अशी भूल
चहूवार फुलांचाच गरजत
होता भव्य हा ताटवा सारा
गुलाबास मिळताच पसंती
उतरलाच एकेकाचा तोरा

