पडकं घर अन थकलेले मायबाप
पडकं घर अन थकलेले मायबाप
जीर्ण झाल्या कुडाच्या भिंती,
अन गळाया लागलंय छप्पर,
तूझ्या जीवनासाठी जीवनभर राबून,
माय झाली टपरी अन बाप टप्पर. //१//
पडक्या तूझ्या घरावरचे,
लाकडं गेले सारे कुजून.
काडीवाणी झाले हातपाय मायबापाचे,
तूझ्या जीवनासाठी चंदनावाणी झिजून. //०२//
माणसं नसलेल्या पडक्या घराला,
जणू लागावा जसा उकिर,
बापाच्या पायाला पडल्यात तशा भेगा,
पण त्याला नाही त्याची फिकीर. //०३//
मायबापाच्या थकलेल्या नजरा,
अन पडक्या घराचा दरवाजा,
रात्रंदिवस पाहतात वाट तुझी,
व्याकुळ झाले तुला पाहण्याकरिता. //०४//
नाही माहित भोळ्या तुझ्या बापाला,
कुठं तूझं ऑफिस अन काय तुझी पोस्ट,
'ल्योक माझा मोठा साहेब हाय',
एकच ही माहित त्याला गोष्ट. //०५//
ओसाड झालं अंगण सारं,
तु रांगलेल्या पडक्या घराचं,
सुरकुतून गेला मायबापाचा चेहरा,
कौतुक ऐकत लाडक्या पोराचं. //०६//
ते पडकं घर अन थकलेले ते मायबाप,
गड्या एकदा तरी आता पाहून ये,
नको करू डागडुजी की नको देऊ पैसा,
पण ओला कोरडा जीव जरासा लावून ये.
पण ओला कोरडा जीव जरासा लावून ये.//०७//
