पाऊस तराणं भिन्न भिन्न
पाऊस तराणं भिन्न भिन्न
पागोळ्यांचा षड्ज, ढगांचा मेघमल्हार घुमतो
मयुर नर्तनासम सरींचा थुईथुई खेळ रंगतो
पशूपक्षी, झाडेवेली, डोंगरदऱ्या शुचिर्भूत करतो
नभाचं धरती मिलन, प्रसन्नशी हिरवळ रंगवतो //१//
तुषारांचा मुकूट माथी, पावसात हुंदडत मिरवतो
एका छत्रीत हातात हात घालून हृदयात स्पंदतो
नजरेची भाषा नजरेने टिपत, प्रेमीजनांत बहरतो
अवखळ धारा झेलत अंतरीचं गुपित सांगतो //२//
भेगाळलेली धरती, थेंबाथेंबानं तृप्त होते
मृद्गंधानं साऱ्या तनामनाला, सृष्टीस मोहविते
एकेका रोपांसंगं बळीराजा आपलं काळीज पेरतो
शिवारी फुलणारं हिरवकंच लेणं पाहत विठूनाम घेतो //३//
दीनवाण्या चंद्रमौळी झोपडीतून पाऊस ठिबकतो
फाटक्या तुटक्या संसारातील तो लाचार जगतो
एवढासा निवारा ठायीठायी पोचलेल्या भांड्यांनी व्यापतो
चिरगुटं, ठिगळांची लक्तरं पावसात भिजवतो //४//
फुटपाथवरचं कणाकणाने मरणासन्न जगणं
नुक्कडवरच्या भजीच्या वासानंच पोट भरणं
थंडीनं काकडणाऱ्या, देहामनाचं कलकलणं
पावसाच्या थेंबाथेंबांचा छळवादी मार खाणं //५//
अस्सं असलं तरी, खुळावतं साऱ्यांनाच त्याचं येणं
ग्रीष्म ऊन्हाने सृष्टीची काहिली तृप्तावते त्याच्या येण्यानं
कोरडेठाक पडलेल्या नद्यानाल्यांचं खळाळत वाहणं
पाऊस पडताच धरेचे अन्नब्रह्म पुजेचे असिधारा व्रत घेणं //६//
