प्रेमगीत
प्रेमगीत
मोहरून जातो जीव , घेता कुशीत
रोमरोमी शहारते , तुझ्या प्रितीत //ध्रृ//
लाज ही सारुनी , प्रीत रंगली अशी
सर्वांगावरी ही नक्षी , रेखली कशी
रातराणी सुगंधात ही, रात वेडीपिशी
शशी आला कसा हा , चांदणं शिंपीत //१//
रोमरोमी शहारते तुझ्या प्रीतीत//ध्रृ//
काजव्यांसंग चंद्रमा हा, आला खेळूनी
गंध उधळीत वात , तो ही आला अंगणी
सावल्यांचा खेळ चाले , चंद्रकिरणी
पान्हावते मन राजा , येता तू मस्तीत //२//
रोमरोमी शहारते तुझ्या प्रीतीत//ध्रृ//
रातकिड्यांचं संगीतही , चाले रात्रीत
चांदव्यासमवेत , ह्या चांदण्या वेचीत
चल रं सख्या जरा , मस्त गारव्यात
शुभ्र दंवात न्हाऊ ,होऊ पुलकीत //३//
रोमरोमी शहारते तुझ्या प्रितीत //ध्रृ//
तव स्पर्श होता , थरारते अंगांग
लक्ष लक्ष डोळे , न्याहळती सर्वांग
फुलपंखी पियुष , प्राशिता शुभांग
मनी वसंत फुलतो , मोगरा मोहवीत //४//
रोमरोमी शहारते तुझ्या प्रीतीत //ध्रृ//