नेमका पाऊस येतो
नेमका पाऊस येतो
गर्दीत एकटा चालताना अचानक समोर तू दिसतेस
असे अनपेक्षित तुला पाहताना नेमका पाऊस येतो
नयनात तुझ्या उतरून थेट हृदयाकडे प्रवास करताना
आपल्या प्रेमाचा साक्षीदार म्हणून नेमका पाऊस येतो
भेट संपून आपली तू जड पावलांनी घरी परतताना
तुला तिथेच अडवायला नेमका पाऊस येतो
समुद्रकिनारी तुझ्यासवे हातात हात गुंफूण बागडताना
लाटांसह आपल्यात मिसळायला नेमका पाऊस येतो
सांजवेळी सूर्यास्त पाहताना भारावून तुला बिलगताना
क्षितिजाची लाली भेदून नेमका पाऊस येतो
चांदण्यांनी ढगाआडून तुझे सौंदर्य चोरून बघताना
त्यांचे पाणी पाणी होऊन नेमका पाऊस येतो
मध्यराती तुझ्या आठवणीत मी कणकण जळताना
मनाची धग शमवायला नेमका पाऊस येतो
प्रितीच्या मिलनावेळी माझ्या मिठीत तू विसावताना
मनातील तप्त भावना लपवाया नेमका पाऊस येतो
ऋतू कोणताही असो पण जेव्हा केव्हा तू रडतेस
तेव्हा तुला साथ द्यायला नेमका पाऊस येतो
हे सर्व आठवून मी आत्ता ही कविता लिहीताना
खिडकीतून डोकावून पाहता बाहेर नेमका पाऊस येतोय

