मुक्ती
मुक्ती


नका म्हणू पुन्हा पुन्हा मला बारबाला
जेंव्हा होते बाला, निर्दयी राक्षसाला साक्षात्कार झाला
अर्धनग्न अंधारात ढकलले मला
परतीची वाट सापडेचना मला
रोज नाचाच्या फरशीवर फरफटत
हातातल्या फडफडत्या नोटांवर नजर ठेवायला शिकले
धडाडत्या बँडवर शाळेतले लेझीम विसरले
उसल वडापाव खाता घरचे जेवण विसरले
फुटलेल्या कुलशीलाच्या काचा बोचून
निबरलेल्या अंगावरून परत जातात
आता सुटकेची निमंत्रणं
जीवही कळवळत नाही कुणा तान्ह्ययाच्या रडण्यानं
मातृत्वाच्या वाटांचे रस्ते केलेत मी बंद
माझ्यानंतर नको तिला बारबालेचा जन्म
अन् नको त्यानं घालायला बारबाला जन्माला
आतातरी अशीतशी म्हणू नका मला
बारबालेच्या मुक्तीचा मार्ग सापडलाय मला
परतीची गल्ली सापडलीय मला.