मुग्ध अबोली सांज
मुग्ध अबोली सांज
1 min
43
रोज येतसे तशीच गुपचूप येऊन गेली आज
मुग्ध अबोली सांज, तियेचा आज निराळा बाज
सलज्ज हसरी सांज नववधू
भाळी कुंकुम तो पुरणेंडू
घेवून आली मला द्यावया
मृदुल चांदण साज.......१.
जरी अप्सरा पूर्व-पश्चिमा
परी संध्येच्या रम्य रक्तिमा
भांगी भरण्या मागती सिंदुर
होत्या तिजला आज.........२.
सुख स्वप्नाच्या उभी अंगणी
आठवणींचे दीप उजळूनी
गेली देऊनी जाता जाता
स्निग्ध गुलाबी लाज.........३.
काळोखाचे जहाज आले
तिला घेवूनी दूर निघाले
शुभ्र चांदणे शिंपीत गेली
दिपवित मनीचा ताज..........४.