मनातला पाऊस...
मनातला पाऊस...


चाहूल वेड्या जीवाला लागता
करतो चिंब मनातला पाऊस
डोळ्यात दाटे आठवणींचा पाठ
भिजण्याची भारी वाटे हौस
नभांची काळीकुट्ट रास पाहता
खोल अंतर्मनी होई शंख नाद
स्वप्नवेडया पंखांच्या समवेत
उडण्यास घाली आकाश साद
बेधुंद मेघांचा कडकडाट होता
शोधे आसुसलेले नेत्र आसरा
मिठीत घेता पावसाचे थंड थेंब
सैरभैर मनाला सुखद शहारा
धिंगाणा घाली, अलगद भाव
रिमझिम, टपटप मधुर संगीत
आतुरतेने मनसोक्त कानी गुंजे
जलधारांच्या स्पर्शनादाचे गीत
आसवांच्या लुप्त वेदना दडता
चेहऱ्यावरच्या निरागस स्मितात
निसर्ग किमयेचा हिरवागार थाट
गाढ रुजतो अबोल, धुंद नयनात
असाच खट्याळ, नटखट पाऊस
मंद वाऱ्यासोबत झुलत रहावा
कोमल, मृदू स्मृतींना उजाळा देत
आनंदाश्रूंच्या तालात डोलावा