तू मला जाणून घेताना...
तू मला जाणून घेताना...
तू मला जाणून घेताना...
पुढे खचशील बहुतेक बऱ्याचदा
मी ढसाढसा रडत नसले तरी
अशांत हृदयातली कातर शांतता
कदाचित खायलाच उठेल अरे तुला...
अवकाशातल्या मोजताना खळ्या
हर्षात न्हाऊन निघशील ना तू
तेव्हा स्पर्शून जाताना विचारमग्न मला
मंद पाऊसधाराच भासतील अरे तुला...
अंधारातल्या उजेडात मिसळशील
तेव्हा कोपऱ्यात कुठेतरी हरवलेली
जणू बाहुलीतच लपेटलेली मी
लहान मुलासारखी गवसेल अरे तुला...
नकळत मला बिलगशील
तेव्हा माझ्या काळजातले बोल
आपोआप तुझ्या ओठांवर हसतील
तेव्हा कधी खळखळ हसणारा झरा
तर कधी मुर्खही वाटेल अरे मी तुला...
तुझा माझ्यापर्यंतचा प्रवास
तितकासा सोपा नसेलही अरे...!
पण जरा सबुरीने घेत अन्
प्रश्नचिन्हांचं वादळ मिटवत
माझ्यात थोडंसं डोकावशील तर...
तर नक्कीच सापडेल अरे मी तुला...
हे मना... तू मला जाणून घेताना
परलोकचा प्रवास नसेल रे हा
हळुवार स्पंदनांचा माग घेत आलास तर
मी तुझ्यातच सापडेल अरे तुला...!!!