मनाचे सत्य
मनाचे सत्य


खरं सांगा ना त्या कळ्यांना
प्रत्येक रात्रीनंतर दिवस उगवतो
पण दिवसानंतर रात्र परत येणार
हेही सांगा त्यांना
निदान कोमेजणार नाहीत
पाकळी पाकळी फुलताना
फक्त प्रकाश म्हणजेच आनंद नव्हे
ग्रीष्मात सूर्यही त्राही त्राही करतो
आणि कधी रात्रही शीतल चांदणे शिंपडते
काळा ढगही अमृत वर्षाव करतो
सांगा त्यांना आठवण करून द्या
निदान अमावस्येच्या अंधारात पावले अडखळणार तरी नाहीत
सुख दुःख दिवस रात्र
मनाचीच सारी आंदोलने आणि कंगोरे
सुखाच्या थेंबांनी लाईफला बकेट समजून
भरण्याचा दुबळा प्रयत्न
कलंडली की ती रितीच होणार
सांगा त्यांना ती लिस्ट सर्वांचीच अधुरी असते
लहानपणी पाठ केलेले मनाचे श्लोक
रामदासांनी एकांतात लिहिलेले
जनी सर्व सुखी असा कोण आहे
विचारे मना तुचि शोधुनि पाहे म्हटलेले
सुखी माणसाचा सदरा शोधायला सांगणारे
मनाच्या अवस्था दर्शवणारे
पण हेही सांगा त्यांना एक छत्रपतीही घडविला त्याच श्लोकांनी
स्वराज्यात मोकळा श्वास घेण्याकरितां