मैत्री
मैत्री
मैत्री झाली ती काय असते हे कळण्याआधी
न कळत्या वयात
रोज तिला भेटायची गरज सगळ्या गोष्टी सांगायला
एकत्र सागरगोट्या लगोऱ्या लपाछपी लंगडी खेळायला
शिंपल्या पोष्टाची बसची तिकीटं जमवायला
बाबांनी दिलेली गोळ्या चॉकलेट खेळणी तिच्याबरोबर वाटून घ्यायला
तिच्याबरोबरच खायचा डबा वाटून खाताना
पण ती माझीच मैत्रीण आहे हा शिक्का मारायला
तिच्याबरोबर हसताना तिच्या रडण्याने गलबलताना
अगदी सगळे माझ्यावर हसत असताना
ही का रडते म्हणून
तिला लागले तर जीव घाबरघुबरा होताना
कोणी सांगितले नव्हते मैत्री म्हणजे काय
आज जेव्हा कळते मैत्री म्हणजे काय
तेव्हाही तिच्याशी काहीतरी बोलायचंय म्हणून वेळ काढण्यासाठी धडपडताना
तिला सांगून तिला ऐकताना हरखून जाताना
मनातल्या एका कप्प्यावर आजही तिचंच राज्य आहे
ही जाणीव मैत्रीतच जगण्याचा मार्ग सोपा करते