मला न्याय मिळेल का?
मला न्याय मिळेल का?
का तोडता सहज मजला?
कळी मी तुमच्याच बागेची,
फुलू द्या मज जीवन बागेत
इच्छा वाऱ्या संग डोलायची...१
रोवूनी पाया स्त्री शिक्षणाचा
वाट दाविली माईंनी ज्ञानाची,
चूल मुल माझ्यासाठी फक्त
नाही का चिंता या दुहिताची??२
वावरात दिस रात राबतसी
म्हणती पोशिंदा मी जगाचा,
तरीही उपासमारी ललाटी
का दाखवती मुजरा मानाचा??३
थाट वाढवा म्हणूनी, बघा
हात पाय सहज ते जोडती,
सांगती, शाही आहे जनाची
का कोश फक्त स्वतः भरती??४
कुठे रंग गडद तर कुठे फिकट
पण डंका वाजवती समानतेचा,
सांगा, मला न्याय मिळेल का?
आहे मीही अंश भारत मातेचा..५
